मला अटॅक आल्यानंतर तुला समजणार आहे का? प्रदिप पटवर्धन यांच्या आयुष्यातील तो किस्सा पाहून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | संपूर्ण मराठी कला विश्वावर आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवणारे अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये दुःखाचा पारावार उरला नाही. गिरगाव येथील राहत्या घरी त्यांनी आपले डोळे मिटले. या बातमीमधून प्रदीप पटवर्धन यांच्या आयुष्यातील काही रंजक किस्से जाणून घेऊ.

 

प्रदीप पटवर्धन हे लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. सुरुवातीला अभिनयाची गोडी लागल्यानंतर त्यांनी अनेक एकांकिकांमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर आपल्या अभिनयाला आणखीन चकाकी देत त्यांनी व्यवसायिक नाटकांकडे आपला मोर्चा वळवला. यावेळी त्यांचे मोरूची मावशी हे नाटक प्रचंड गाजलं. आजही अनेक प्रेक्षकांना हे नाटक आणि या नाटकामधील सर्व पात्र अगदी तंतोतंत लक्षात आहेत. त्यातीलच प्रदीप पटवर्धन यांचे पात्र तुफान गाजले होते. त्यांचा अभिनय आणि डायलॉग फेकण्याची पद्धत अनेकांच्या मनावर राज्य करत होती.

Advertisement

 

मात्र याच अभिनयाच्या गोडीने त्यांच्या आईने एकदा त्यांना चांगलीच तंबी दिली होती. सह्याद्री वाहिनीवरील “दुसरी बाजू’ या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला होता. यावेळी त्यांनी अगदी सुरुवातीपासून ते अभिनयात मोठी झेप घेईपर्यंतचा संपूर्ण प्रवास सांगितला होता. प्रदीप पटवर्धन यामध्ये म्हणाले होते की, ” इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत मी अभ्यासात चांगलाच हुशार होतो. यावेळी मी माझा पहिला नंबर कधीच सोडला नाही. वर्गामध्ये मी नेहमीच पहिल्या नंबरने पास व्हायचो. मात्र त्यानंतर एकांकिकेची गोडी लागली आणि अभ्यासाकडे माझं दुर्लक्ष झालं. यावेळी मला कमी मार्क मिळू लागले. “

Advertisement

 

पुढे अकरावी मध्ये असताना प्रदीप पटवर्धन दोन वेळा नापास झाले होते. तिसऱ्या प्रयत्नात ते कसेबसे काठावरती पास झाले. या सर्वांमुळे प्रदीप पटवर्धन यांचे आई आणि बाबा दोघेही खूप चिंतेत होते. वर्गात नेहमी पहिल्या क्रमांकावर पास होणारा मुलगा एकाएकी एवढा मागे पडत चालला आहे हे पाहून त्यांची चिंता वाढत होती. अकरावी नंतर पुढील शिक्षण घेत असताना प्रदीप यांनी अनेक एकांकिका आणि महाविद्यालयाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. यावेळी प्रदीप सांगतात की, “

 

अभिनयातून मला मिळालेले बक्षीस पाहून माझ्या आई-बाबांना खूप आनंद व्हायचा. सुरुवातीला त्यांनाही खूप छान वाटायचे. मात्र नंतर हळूहळू माझे वय वाढू लागले होते. अभिनयातून मला तितकाच पैसा मिळत नव्हता. त्यामुळे आई-बाबांना पुन्हा एकदा टेन्शन आले. आपला मुलगा आता मोठा झाला आहे मात्र त्याच्याकडे चांगली नोकरी नाही या चिंतेने ते त्रस्त होते.

 

पुढे प्रदीप यांनी सांगितलं की, ” मी कसाबसा बीकॉम पर्यंत पोहोचलो. त्यामुळे आई-वडिलांना वाटले की आता मला चांगली नोकरी लागेल. मी बऱ्याच ठिकाणी नोकरी केली. अगदी क्लास पुसण्यापासून तर एका ऑफिसमध्ये टायपिंगचे काम करण्यापर्यंत मी कामे केली होती. मात्र मनासारखे काम मिळत नसल्याने माझी ओढ अभिनयाकडे जास्त होती.

 

यावेळी एक दिवस माझी आई चांगलीच फडकली. कारण नाटकांमुळे घरी यायला रात्री रोज उशीर व्हायचा. त्यामुळे आई मला म्हणाली की, मला अटॅक आल्यानंतरच तू हे असं वागणं थांबवणार आहेस का? बास झालं नाटक. आता कोणतीतरी नोकरी शोधून कामाला जा. असं माझी आई मला ओरडली होती. तसेच एकदा आई आणि बाबांनी मिळून मला चांगलाच ओरडा दिला होता. त्यांनी मला म्हटलं होतं की, इथून पुढे नाटकांमध्ये काम करायचं नाही कोणतीतरी एक चांगली नोकरी बघ आम्ही तुला वर्षभराचा कालावधी देतो.

 

नाहीतर वर्षभरानंतर बोरवलीत रिक्षा चालकाचे काम सुरू कर.” मात्र या सर्व परिस्थितीत सुदैवाने प्रदीप यांना बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळाली. नोकरी विषयी सांगताना ते म्हणाले की, ” मी घरी आलो आणि आईला सांगितलं की मला 17 जून पासून नोकरीवर बोलावलं आहे. बँक ऑफ इंडियामध्ये मला नोकरी लागली आहे. यावेळी आईला माझ्यावर विश्वास बसत नव्हता.

 

तिला शेजारच्या एका मुलाला बोलावून मिळालेले लेटर वाचून दाखवायला सांगितलं आणि नोकरी खरंच लागली आहे का याची खात्री करून घेतली. त्यादिवशी माझी आई मला जवळ घेऊन खूप रडली होती. तसेच तिने मला नंतर सांगितले की आता तू नोकरी आणि नाटक दोन्हीमध्ये पण काम कर. ” कार्यक्रमामध्ये हे सर्व प्रसंग सांगत असताना प्रदीप पटवर्धन यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *