ही दोस्ती तुटायची नाय; नानांनी अशोक सराफ यांची राखली होती लाज; नाना पाटेकरसोबत पत्ते खेळताना अशोक सराफ मुद्दाम हरायचे..

मुंबई | मैत्रीच्या नात्याला तोड नाही, असं म्हणतात ते उगाच नाही. जीवाला जीव देणारा मित्र मिळणं म्हणजे भाग्य. संकटकाळी आपल्यासाठी धावून येणारे हे मित्रच असतात. चित्रपटातील मैत्रीचे सीन पाहून आपल्या मनात अशाच मैत्रीची अपेक्षा निर्माण होते. पण खरे नशीबवान तेच ज्यांना खऱ्या आयुष्यात असे मित्र असतात. ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांना देखील ते भाग्य लाभलं आणि त्यांच्यासाठी नाना पाटेकर अडचणीत धावून आले.
काय झालं होतं ?:
“नाटक रद्द झाल्याने लोक मला मारण्यासाठी माझ्या मागे धावले होते. त्यावेळी नानाने मला तेथून पळवलं. थिएटरच्या मागच्या बाजूने गटारातून उडी मारुन आम्ही पळालो. मला घेऊन तो अक्षरश: धावत होता.
ढकलण्याची जी रिक्षा असते ती त्याने थांबवली. तो स्वत चालवू लागला आणि मला घेऊन गेला. नाना पाटेकरने माझा जीव वाचवला आहे. नाही तर लोकांनी मला मारला असता,” अशी आठवण अशोक सराफ यांनी मुलाखतीत सांगितली होती.
अशोक सराफ यांनी देखील नानांची केली होती मदत:
नाना पाटेकर यांनी देखील एका कार्यक्रमात बोलताना अशोक सराफ यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख केला होता. “हमीदाबाईची कोठी नाटक करताना मला 50 रुपये मिळायचे आणि अशोक सराफला 250 रुपये मिळायचे.
त्याने मला पैशांची खूप मदत केली. मधल्या वेळात नाटक नसताना आम्ही पत्ते खेळायचो. त्यावेळी तो मुद्दामून माझ्याकडे पाच दहा रुपये हारायचा. मला कळायचं तो मुद्दामून करतोय. पण पैशांची गरज होती त्यामुळे मी सुद्धा घ्यायचो.