कधी बनले वेटर तर कधी घासली भांडी, प्रदीप पटवर्धन यांच्या आयुष्यातील संघर्ष वाचून डोळ्यात पाणी येईल
मुंबई | ९ ऑगस्ट रोजी प्रदीप पटवर्धन यांची प्राणज्योत मालवली. गिरगाव येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन हे मराठी प्रेक्षकांसाठी खूप मोठा धक्का होता. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी मराठी रंगभूमी खूप गाजवली होती. त्यांच्या निधनानंतर आता सोशल मीडिया वरती त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम सुरू आहे. अनेक व्यक्ती प्रदीप पटवर्धन यांच्या जुन्या आठवणी ताज्या करत आहेत. अशा ताज्या बातमीतून प्रदीप पटवर्धन यांच्या आयुष्यातील काही खडतर प्रसंग जाणून घेणार आहोत.
प्रदीप पटवर्धन यांचे रंगभूमी विषयी अगदी घट्ट नाळ जोडली गेली होती. त्यांना अभिनयाची फार गोडी होती. मात्र सुरुवातीला त्यांच्या हाती काही काम नव्हते. त्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये काचेचे ग्लास पुसण्याचे काम देखील केले होते. एकदा प्रदीप पटवर्धन विक्रम गोखले यांच्या दुसरी बाजू या शोमध्ये पोहोचले होते. त्यावेळी विक्रम गोखले यांच्या समोर त्यांनी अनेक गोष्टींचे खुलासे केले. यावेळी नोकरी संदर्भात त्यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा केला होता.
त्यावेळी प्रदीप पटवर्धन म्हणाले होते की, ” मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. मात्र सुरुवातीला मला काम मिळत नव्हते. त्यामुळे मी एका हॉटेलमध्ये काचेचे ग्लास पुसण्याचे काम करत होतो. त्यानंतर एका बँकेत मी टायपिस्ट म्हणून देखील नोकरी केली. मात्र अभिनयाची आवड असल्याने मला कोणत्याच कामांमध्ये रस नव्हता. मला फक्त अभिनय करायचा होता.”
त्यानंतर त्यांनी सांगितले की, ” मी अनेक नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर सर्कस प्रेमाची या मालिकेमध्ये मला एक भूमिका मिळाली. यातील माझ्या पात्राला प्रेक्षकांनी पसंती दिली. त्यानंतर आवड आपली आपली मध्ये देखील मी झळकलो. तसेच नवरा माझा नवसाचा, चष्मे बहाद्दर अशा चित्रपटांमध्ये देखील मी काम केले. रुपेरी पडद्यावर झळकत असताना मी नेहमी छोट्या मोठ्या भूमिका केल्या.
” यावेळी त्यांनी असं का केलं असा प्रश्न विचारण्यात आला? त्यावेळी विक्रम गोखलेंना प्रदीप पटवर्धन म्हणाले की, ” माझा जास्त कल हा रंगभूमीकडे होता. रंगभूमीवर झळकलेल्या कलाकाराला कोणी कधीच विसरत नाही असे मला वाटते. कारण नाटकात काम करत असताना आपण जे पात्र साकारतो त्याची एक वेगळी छाप पडते. मला माझी ही ओळख कधीच पुसायची नव्हती. त्यामुळे मी चित्रपट आणि मालिकांमध्ये नेहमी छोट्या-मोठ्या भूमिका स्वीकारल्या.”
नवोदित कलाकारांबरोबर अभिनय करण्याविषयी ज्यावेळी त्यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, ” आपणही कधी ना कधी एक नवीन अभिनेता होतो. मला आजही मी एक नवोदित कलाकार आहे असेच वाटते. कारण प्रत्येक नवीन व्यक्तीकडून आपण वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी शिकत असतो. या गोष्टी शिकण्यामध्ये देखील एक वेगळी मजा असते. मला नेहमीच नव शिष्य म्हणून जगायला आवडले. त्यामुळे मला हा प्रश्न बऱ्याच व्यक्ती विचारायच्या. मात्र माझं नेहमी हेच उत्तर असायचं की मी देखील एक नव शिष्य आहे.”
विक्रम गोखले यांनी प्रदीप पटवर्धन यांना अभिनय क्षेत्रात वेगवेगळ्या कलाकारांचे कसे अनुभव आले याविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले की, ” मी आतापर्यंत अनेक नवीन कलाकारांबरोबर काम केले. कलाकार जेव्हा नवीन असतो तेव्हा तो छोट्या खोलीत राहत असतो. मात्र चित्रपटाच्या शूटिंग वेळी मुंबई बाहेर जावे लागल्यास त्याला प्रशस्त हॉटेल हवे असते. मग तो त्याच्या घरात रोज जमिनीवर झोपत असला तरी देखील त्याला मऊ गादीचा बेड शूटिंगच्या वेळी हवा असतो. कलाकारांचे हेच असले मला अजूनही समजलेले नाहीत. काही निवडक कलाकार असे आहेत. बरेचसे कलाकार अजूनही जसे असेल त्या पद्धतीत ऍडजेस्ट करतात.”
ठराविक कलाकारांचे कास्टिंग आणि मोठे प्रोजेक्ट याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ” काही व्यक्ती मला स्वतः म्हणाले आहेत की आपण एक दिवस एकत्र काम करू. मात्र जेव्हा कामाची खरी वेळ आली तेव्हा त्यांनी त्यांच्या आवडत्या कलाकारालाच काम दिले. यामध्ये गटबाजी मोठ्या प्रमाणावर आहे. या लोकांना ठराविक गटातील व्यक्तींनाच काम द्यायचे आहे. त्यामुळे मोठे प्रोजेक्ट त्या व्यक्तींकडेच जातात.”
प्रदीप पटवर्धन यांनी त्यांच्या कारकीर्दीत मोरूची मावशी हे नाटक खूप गाजवले. आपल्या आईच्या म्हणण्यानुसार त्यांनी रिटायरमेंट पर्यंत बँकेत नोकरी केली. त्यांनी आपल्या आईचा प्रत्येक शब्द पाळायला. तसेच ते नेहमी आपल्या मातीशी घट्ट जोडलेले राहिले. कितीही प्रसिद्धी मिळाली तरी देखील त्यांनी याचा कधीच गौरव केला नाही.