जेऊर | गेल्या अनेक वर्षांपासून शेलगांव चौक ते वांगी नं. २ रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. शेलगांव – दहीगाव – वांगी २ अशा तीन गावांमधून जाणाऱ्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. उजनी बॅकवॉटर परिसर असल्यामुळे याठिकाणी सर्वच शेती बागायती आहे.
मात्र रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतात पिकविलेला माल मार्केटमध्ये घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात देखील घडत आहेत. नागरिकांकडून सातत्याने संबंधित अधीकाऱ्यांकडे तसेच लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. मूळ रस्ता हा ६.० किलोमीटर आहे. आमदार संजय शिंदे यांनी अधिवेशनात १ कोटी ४५ लाख रुपये निधी ०.० ते ३.० किलोमीटरसाठी मंजूर केल्याचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र तो निधी फक्त कागदावरच दिसत आहे. कारण संबंधित रस्त्याचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी या रस्त्यासाठी टेंभुर्णी करमाळा या मुख्य महामार्गावर रास्तारोको करण्यात आला होता. लवकरात लवकर उर्वरित मंजुरी देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ठळक मुद्दा – वारंवार होत आहेत अपघात – रस्त्याची स्थिती अत्यंत बिकट झाल्यामुळे रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. यामुळे जीवित हानीचा देखील प्रश्न उद्भवला आहे. तसेच काहींना अपगत्व देखील आले आहे. वांगी – दहीगाव – शेलगांव गावामध्ये रुग्णालये नसल्यामुळे आपत्कालीन वेळेला रुग्णांना मोठ्या रुग्णालयात जाण्यासाठी जास्त वेळ जात असल्याने रुग्णांची स्थिती देखील गंभीर बनते.
खड्ड्यात रस्ते का रस्त्यावर खड्डे अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. आम्हाला खूप मोठ्या संकटांचा सामना या रस्त्यामुळे करावा लागत आहे. तरी प्रशासनाने लक्ष घालून रस्ता तात्काळ मंजूर करावा.
-रोहिदास माने (ग्रामस्थ वांगी)