आकरावीत दोन वेळा नापास झाले होते प्रदीप पटवर्धन; रिझल्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल
मुंबई | 9 ऑगस्ट 2022 रोजी प्रदीप पटवर्धन यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचे निधन होऊन आता चार ते पाच दिवस झालेले आहेत. मात्र अजूनही चाहते या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सोशल मीडियावर सतत प्रदीप पटवर्धन यांच्या विषयी वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. प्रदीप पटवर्धन यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले. चित्रपटांपेक्षा त्यांना रंगभूमीकडे जास्त आकर्षण होते. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत नाटकांची संख्या जास्त आहे.
1 जानेवारी 1970 रोजी प्रदीप पटवर्धन यांचा जन्म झाला. मुंबईतील गिरगाव परिसरात ते जन्माला आले. प्रदीप पटवर्धन हे लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. शालेय शिक्षण घेत असताना त्यांचा नेहमी प्रथम क्रमांक येत होता. मुंबईतील आर्यन एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. यावेळी शाळेमध्ये ते नेहमीच प्रथम क्रमांकावर असल्याने आई-वडील फार खुश असायचे.
प्रदीप पटवर्धन यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी दाखला घेतला. याच दरम्यान त्यांना अभिनयाची गोडी लागली. कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा एकांकिकामध्ये सहभाग घेतला. सुरुवातीला त्यांच्या आई वडिलांना हे फार आवडत होते. कारण नाटक केल्यानंतर त्यांची खूप वाहवा होत होती तसेच त्यांना ट्रॉफी देखील मिळत होत्या. मात्र अकरावीमध्ये त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. त्यांनी पूर्ण वेळ अभिनयाकडे दिला. त्यामुळे अकरावीमध्ये ते दोन वेळा नापास देखील झाले.
शाळेमध्ये दरवर्षी प्रथम क्रमांकावर पास होणारा मुलगा अकरावीत आल्यावर दोन वेळा नापास झाला आहे हे त्यांच्या आई-वडिलांना सहन होत नव्हते. त्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी त्यांना एकदा दम दिला. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या सर्व गोष्टींचा खुलासा केला होता. यावेळी प्रदीप म्हणाले होते की, “मी अकरावीत दोन वेळा नापास झालो होतो. मात्र नंतर मी जिद्दीने अभ्यास केला आणि कशीबशी अकरावी सोडवली. त्यानंतर पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण मी सिद्धार्थ कॉलेजमध्येच पूर्ण केलं. यादरम्यान मला नाटकांची अधिक गोडी निर्माण झाली.”
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रदीप पटवर्धन यांनी व्यावसायिक नाटकांकडे धाव घेतली. यावेळी नाटकांच्या शोमुळे त्यांना बऱ्याचदा घरी जायला उशीर व्हायचा. रात्र रात्रभर कधीकधी बाहेर थांबावे लागायचे. यावेळी घडलेला एक प्रसंग त्यांनी स्वतः सांगितला. ते म्हणाले की, ” नाटकाच्या कामामुळे मी दिवसभर बाहेर असायचो.
घरी यायला कधीकधी रात्री खूप उशीर व्हायचा. त्यामुळे एक दिवस माझी आई माझ्यावर खूप चिडली होती. ती म्हणाली होती की, मला अटॅक आल्यानंतरच तुझं हे नाटक संपणार आहे का? हे सगळं सोडून नोकरीला लाग. तुला आम्ही एक महिन्यांची मुदत देतो. या कालावधीत कोणतीतरी नोकरी शोध नाही तर गिरगावात रिक्षा चालवायला सुरुवात कर.”
असं सांगितल्यावर प्रदीप पटवर्धन यांनी नोकरीचा शोध घ्यायला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, ” नोकरीच्या शोधात असताना मी सुरुवातीला एका हॉटेलमध्ये काचेचे ग्लास पुसण्याचे काम केले होते. तसेच एका बँकेमध्ये मी टायपिस्ट म्हणून काम केले होते. घरामधून अशा पद्धतीने ओरडा मिळाल्यानंतर मी पुन्हा एकदा काम शोधायला सुरुवात केली.
त्यावेळी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते. नशिबाने मला बँकेत चांगली नोकरी मिळाली. यावेळी माझ्या आईने मला सांगितले की, आता तू तीन गोष्टींचे पालन करायचे. नियमितपणे नोकरीला जायचे, नाटकांमध्ये देखील काम करायचे आणि लोकांना हसवणे कधीच सोडायचे नाही. असे माझ्या आईने मला सांगितले.” प्रदीप पटवर्धन यांनी अगदी श्रावण बाळाप्रमाणे आपल्या आईच्या सर्व आदेशांचे पालन केले.
अभिनय क्षेत्रात त्यांनी मोरूची मावशी या नाटकातून खूप प्रसिद्धी मिळवली. यावेळी या नाटकाची प्रसिद्धी खूप जास्त होती. नाटक लोकांना एवढे आवडले होते की या नाटकाचे जवळपास अडीच हजारांहून अधिक प्रयोग झाले होते. मात्र या काळात प्रदीप पटवर्धन यांनी नोकरी अजिबात सोडली नाही. नाटक संपवून घरी यायला कितीही उशीर झाला तरी ते सकाळी नित्य नियमाने कामावर हजर राहायचे.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी मोरोची मावशी या नाटकाबरोबरच अनेक नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले. नवरा माझा नवसाचा, बायको असून शेजारी, लावू का लाथ, चष्मे बहाद्दर, एक दोन तीन चार अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. कायम इतरांना हसवत आलेल्या या अभिनेत्याचे 9 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.