प्रदीप पटवर्धन ब्लॅकने तिकिटे विकायचे, विजय पाटकर यांनी सांगितलं तो किस्सा

मुंबई | मोरूची मावशी या नाटकामधून घराघरात पोहोचलेले कलावंत खूप गाजले. या नाटकाच्या यशामागे प्रदीप पटवर्धन यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या अभिनयाने या नाटकाने बक्कळ कमाई केली. 9 ऑगस्ट रोजी हा हरहुन्नरी अभिनेता आपल्या सर्वांना सोडून या जगापासून दूर निघून गेला.

 

प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र दुःखात विलीन झाला आहे. मोरूची मावशी हे नाटक इतके गाजले होते की, या नाटकाची बरीचशी तिकीट ही ब्लॅक केली जात होती. नाटक अथवा चित्रपट भरपूर गाजल्यानंतर त्याची तिकीट ब्लॅकमध्ये विकली जाणार यात विशेष असं काहीच नाही.

 

अनेक चित्रपट आणि नाटकांच्या बाबतीत असं झालेलं आहे. मात्र ही ब्लॅकची तिकीट स्वतः प्रदीप पटवर्धन विकत होते असं त्यांच्याच एका मित्राने सांगितलं आहे. विजय पाटकर आणि प्रदीप पटवर्धन यांची घट्ट मैत्री होती. या नाटकाच्या प्रमोशन वेळी “अस्सल पाहुणे इरसाल नमुने” या कार्यक्रमामध्ये हे दोघेही मित्र पोहोचले होते. यावेळी विजय पाटकर म्हणाले की, “मोरूची मावशी यशाच्या शिखरावर असताना प्रदीप पटवर्धन नाटकाची तिकीट ब्लॅकने विकायचा.” यावेळी प्रदीप यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

 

पुढे विजय पाटकर म्हणाले की, “प्रदीप निर्माते सुधीर भट यांच्याकडून आधीच नाटकाचे जास्तीचे तिकिटे घेऊन ठेवायचा. मग ब्लॅकने विकायचा. नाटकाची कमाई आणि त्यात आणखीन ही वेगळी कमाई हे कसं काय सुचतं?” यावेळी त्या कार्यक्रमात एकच हशा पिकला होता.

 

मात्र आपली बाजू सावरत प्रदीप यांनी लगेचच सांगितले की, ” आमचं नाटक एवढ हिट झालं होतं की, मला हे करण्याची काही गरजच नव्हती. मोरूची मावशी हे नाटक माझ्या एन्ट्री नंतरच सुरू होत होतं. त्यामुळे तिथे अभिनय करायचं सोडून मी बाहेर ब्लॅकमध्ये तिकीट कधी विकणार.” असे सांगितले होते.

 

प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यामुळे मराठी कलाविश्वावर दुःखाची मोठी लाट आली आहे. अशात आता अभिनय क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी आणि त्याचबरोबर त्यांचे असलेले रंजक किस्से या आठवणींमध्ये चाहते भाऊक होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button