मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा! प्रसिध्द विनोदी अभिनेत्याचे निधन
मुंबई | ९ ऑगस्ट हा दिवस मराठी मनोरंजन विश्वासाठी अतिशय दुःख दिवस ठरला आहे. कारण आज प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. प्रदीप यांच्या निधनाने संपूर्ण मराठी विश्वात शोकाकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांचे चाहते आणि कलाकार मंडळी सोशल मीडिया मार्फत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. प्रदीप पटवर्धन यांच्यासारख्या अभिनेत्याचे आकस्मित निधन अनेकांच्या मनाला चटका लावणारे आहे.
प्रदीप यांनी आजवर या मराठी रंगभूमीसाठी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या अभिनयाची महती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे. चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयामुळे नेहमीच तिकीटबारीवर मोठी गर्दी उफाळून येत होती. हृदयविकाराच्या झटक्याने प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 65 वर्षांचे होते. सर्व गुण संपन्न आणि मनमिळाऊ स्वभावाचा हा अभिनेता गेल्याने मराठी सिनेसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
मोरूची मावशी या नाटकातील भैया पाटील ही व्यक्तिरेखा साकारून प्रदीप पटवर्धन घराघरात पोहोचले होते. अनेक व्यक्ती त्यांना बराच काळ भैय्या पाटील या नावाने ओळखू लागले होते. या नाटकातील त्यांचा अभिनय खूप गाजला होता. मराठी रंगभूमीमध्ये आपल्या निखळ अभिनयाने तसेच सुंदर आणि साध्या विनोदाने प्रसिद्ध झालेले खूप कमी कलाकार आहेत. ज्यामध्ये भरत जाधव, अशोक सराफ, विजय चव्हाण, विजय पाटकर अशा काही कलाकारांमध्ये प्रदीप पटवर्धन यांचे नाव देखील आग्रहाने घ्यावे लागेल.
एक फुल चार हाफ या चित्रपट देखील त्यांच्या अभिनयाने खूप गाजला. त्यानंतर ते चष्मे बहाद्दर, डान्स पार्टी, गोळा बेरीज, एक शोध,पोलीस लाईन एक सत्य, 1234, थँक यू विठ्ठला, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय,जर्नी प्रेमाची, परिस अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.
थँक यू विठ्ठला या चित्रपटाची त्यांनी निर्मिती देखील केली होती. तसेच 1234 आणि मेनका उर्वशी या चित्रपटासाठी देखील त्यांनी निर्मितीचे काम केले होते. त्यांच्या निधनाने सोशल मीडियावर अनेक व्यक्ती त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.