बॉलिवूड हादरलं! ब्लॅक फ्रायडे चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या दिग्गज अभिनेत्याचे निधन

मुंबई | ‘ब्लॅक फ्रायडे’ पासून ‘इंडियाज मोस्ट वाँटेड’ सारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून कसदार अभिनयाचं दर्शन घडवणारे अभिनेते जितेंद्र शास्त्री यांचं निधन झालं आहे. अभिनेते संजय मिश्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यांनी जितेंद्र सोबतचा एक जुना व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
जितेंद्र शास्त्री यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका केल्या आहेत. भूमिका छोटी असली तरी जितेंद्र हे जीव ओतून काम करायचे. त्यामुळं त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. दौड, चरस, लज्जा, राजमा चावल, अशोका या सिनेमातही त्यांनी काम केलं होतं.
सिनेसृष्टीतील जवळच्या लोकांमध्ये ते ‘जीतू भाई’ नावानं परिचित होते. रंगभूमीवरही ते कार्यरत होते. कैद-ए-हयात, सुंदरी अशा नाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्याशिवाय, मिर्झापूर या अत्यंत गाजलेल्या वेबसीरिजमध्ये त्यांनी उस्मानची भूमिका साकारली होती. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या इंडियाज मोस्ट वाँटेड चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली.
अभिनेते संजय मिश्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून व्यक्त केला शोक – ‘जीतू भाई, आता तुम्ही असता तर म्हणाला असतात की, ‘मिश्रा, कधी कधी असं होतं की मोबाइलमध्ये फक्त नाव राहतं आणि माणूस नेटवर्कबाहेर जातो. आज तुम्ही या जगात नसलात तरी तुम्ही आमच्या हृदयात कायम राहाल. ओम शांती,’ असं संजय मिश्रा यांनी म्हटलं आहे.