बॉलिवूड हादरलं! विद्या बालन सोबत काम केलेल्या प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; १००हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

मुंबई | मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेते प्रदीप मुखर्जी यांचे निधन झाले आहे. कोलकत्ता येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने पुन्हा एकदा मनोरंजन विश्व हळहळ व्यक्त करत आहे.
प्रदीप मुखर्जी यांना फुफ्फुसाच्या एका गंभीर आजाराने ग्रासले होते. मात्र त्यांच्या या आजाराचे निदान फार उशिरा झाले. 22 ऑगस्ट रोजी त्यांना खूप त्रास होऊ लागल्यावर त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले. इथे त्यांना हा आजार असल्याचे निदान झाले. त्यानंतर बरेच दिवस त्यांच्यावर उपचार सुरू राहिले. रविवारी त्यांची तब्येत आणखीन खालवल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र सोमवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रदीप यांनी सत्यजित रे यांच्या जन अरण्य या चित्रपटात दमदार भूमिका साकारली होती. अनेक चाहते त्यांना आजही या भूमिकेसाठी ओळखतात. विद्या बालन आणि अर्जुन रामपाल यांच्या कहाणी 2 या चित्रपटामध्ये देखील ते महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले होते. दुर्गा राणी सिंग या चित्रपटांमध्ये त्यांनी डॉक्टर मौती हे पात्र साकारले. या पात्राने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
प्रदीप मुखर्जी यांचा जन्म 11 ऑगस्ट 1946 रोजी झाला. लहान असताना पासूनच त्यांना अभिनयाची गोडी होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी नाटकांमधून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली. यावेळी एका नाटकात काम करत असताना सत्यजित रे यांनी त्यांना पाहिले.
त्यानंतर त्यांना प्रदीप यांचा अभिनय फार भावला. त्यामुळे सत्यजित यांनी त्यांना आपल्या चित्रपटाची ऑफर दिली. ही ऑफर स्वीकारल्याने प्रदीप यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. कोरोना काळामध्ये त्यांना दोन वेळा या आजाराचा संसर्ग झाला होता. मात्र दोन्ही वेळा औषध उपचार घेऊन ते बरे झाले होते. आता त्यांच्या निधनाने चाहता वर्ग शोक व्यक्त करत आहे.