…त्यामुळे आपल्याला वेळीच सावध होणे गरजेचे आहे – उद्धव ठाकरे

मुंबई | दृष्टी आणि कोण या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्व पक्षांना इशारा दिला आहे की, आपला देश अराज्यकतेकडे चालला आहे, त्यामुळे आपल्याला वेळीच सावध होणे गरजेचे आहे. देशातील कोरोनाचे संकट ही त्यातली धोक्याची घंटा आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. देशावरचं अभूतपूर्व संकट म्हणजे कोरोना आहे. या संकटातून संपूर्ण देशातील जनतेला सुखरूप बाहेर काढण्याची जबाबदारी सरकारची आहे.
मग ते केंद्र सरकार असो, अथवा राज्य सरकार असो. दोघांनी ही मिळून, हातात हात घालून कोरोणा सारख्या संकटाच्या विरोधात लढलं पाहिजे, पण दुर्दैवाची बाब अशी आहे की, या कोरोना संकटाच्या विरोधात देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकजुटीने लढण्याऐवजी ते एकमेकांच्यावर आरोप-प्रत्यारोप करण्यात, एकमेकांचे दोष दाखवण्यात आपला शक्ती व वेळ व्यर्थ घालवत आहेत. अशा भयानक संकटाच्या वेळी देशातील सर्व जनतेने जात, धर्म, राजकारण, पक्ष, पार्टी, सत्ता, अधिकार, भाषा-प्रांत इत्यादी सर्व भेद विसरून, एकजूट होऊन संकटाशी लढा दिला पाहिजे, अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
अशा महामारी सारख्या संकटाच्या वेळी आपण जर, गांभीर्य लक्षात घेतलं नाही तर, त्यामुळे संपूर्ण देशावर भयानक संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे किमान कोरोना आणि तत्सम आजारांच्यापासून देशातील व राज्यातील जनतेला सुरक्षितपणे वाचवण्यासाठी एकत्र येऊन, विचार विनिमय करून संकटाशी सामना करण्याची वेळ अजून ही गेलेली नाही. आजच्या घडीला देशातील कोरोना ग्रस्तांची संख्या कमी झाली असली तरी, कोरोनाचा धोका मात्र संपलेला नाही. त्यामुळे, सगळे एक होऊ, कोरोणा पळवून लावू, असे आव्हान ही देशातील व राज्यातील सर्व राजकीय पक्षांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.